पुन्हा तेच…
अपघात ही अनेक चुकांची किंवा वाईट घटनांची मालिका असते..
हे मी खूपदा म्हटलंय. नॅट जिओवरही प्रत्येक एपिसोडमधे म्हणतात..
पण माझ्या या लेखमालेतल्या एका लेखावर एका वाचकाने एक शब्द वापरला होता “नियतीचं षडयंत्र..”
हा शब्द ऐकून माझ्या डोळ्यासमोर आली ती पॅन अॅम आणि केएलएमची टेनेरीफमधे झालेली भयानक घटना.. आणि माझी सध्याची लेखमाला विशेषतः भारतात घडलेल्या घटनांवर असूनही ही परदेशी घडलेली गोष्ट त्या यादीत येऊन बसली..
या घटनेत, मला वाटतं, “नियतीचं षडयंत्र” म्हणावं इतक्या गोष्टी जुळून आल्या होत्या..
यात इनव्हॉल्व्ह होत्या तीन पार्ट्या.
-केएलएम या डच कंपनीचं बोईंग ७४७-२०६ बी. हे पहा:
(फोटोज आणि ग्राफिकल इमेजेस: आभार, एअरलाईनर्स डॉट नेट आणि विविध इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टस्. आकृत्या: माझ्या..)

याची कॉलसाईन फोर एट झीरो फाईव्ह होती (म्हणजे त्याचा फ्लाईट नंबर). विमानाचं कंपनीने ठेवलेलं लाडकं नाव होतं र्हाईन. नदीचं नाव. आपण त्याला र्हाईनच म्हणू. “केएलएम र्हाईन”..
-दुसरं होतं ते पॅन अॅम एअरवेज नावाच्या अमेरिकन कंपनीचं बोईंग ७४७-१२१. हे असं होतं:

याचा फ्लाईट नंबर होता वन सेव्हन थ्री सिक्स. त्याचं लाडकं नाव होतं क्लिपर व्हिक्टर. याच विमानाने पॅनअॅमची पहिली बोईंग ७४७ सेवा १९७०ला सुरु झाली होती. त्याला आपण “पॅन अॅम क्लिपर व्हिक्टर” म्हणू. किंवा “पॅन अॅम क्लिपर”
- तिसरी सहभागी पार्टी म्हणजे टेनेरीफचा कंट्रोल टॉवर. टेनेरीफ हे स्पेनच्या टेरिटरीत असलेलं बेट. आफ्रिकेच्या थोडं उत्तर-पश्चिमेकडे अटलांटिक समुद्रातल्या कॅनरी आयलंड्सच्या समूहात असलेलं एक मोठं बेट.
टेनेरीफला त्यावेळी एकच एअरपोर्ट होता. या पार्टीला आपण “टेनेरीफ टॉवर” म्हणू.
कधी झालं? तर सत्तावीस मार्च एकोणीसशे सत्त्याहत्तरला…
आता पहिली गोष्ट म्हणजे पॅन अॅम क्लिपर आणि केएलएम र्हाईन, या दोन्ही अवाढव्य विमानांचं इच्छितस्थळ, डेस्टिनेशन मुळात टेनेरीफ नव्हतंच. पण तरीही दोन्ही विमानं टेनेरीफला आली.
या दोघांना, आणि इतरही खूप विमानांना ग्रॅन कॅनेरिया या बेटावर पामास एअरपोर्टवर उतरायचं होतं. पण ग्रॅन कॅनेरियाला एअरपोर्टवरच एक बॉम्ब ब्लास्ट झाला. त्याने खूपच घबराट उडाली. बरं बॉम्ब फुटण्याआधी धमकीचा कॉल आला होता. त्याप्रमाणे खरंच बॉम्ब फुटला. त्यामुळे “अजून एक बॉम्ब जिवंत आहे” अशा दुसर्या कॉलला महत्त्व देणं आलंच…
म्हणून तिथल्या पोलीस आणि एअरपोर्ट ऑथॉरिटीजनी ग्रॅन कॅनेरिया विमानतळ बंद केला आणि बॉम्बचा शोध चालू केला. तेवढ्या वेळात तिथे येऊ इच्छिणारी सर्व विमानं टेनेरीफला डायव्हर्ट केली.. त्यात केएलएम र्हाईन आणि पॅनअॅम क्लिपर आलीच.
केएलएम र्हाईनमधे कॅप्टन होता व्हॅन झॅंटेन आणि कोपायलट क्लास मूर्स. यांचं विमान अॅमस्टरडॅमहून एका ट्रॅव्हल कंपनीने चार्टरवर घेतलं होतं आणि त्यातल्या टुरिस्टना ग्रॅन कॅनेरियाला सोडून विमानाला परत लगेच त्याच “क्रू”च्या हाताखाली अॅमस्टरडॅमला परत जायचं होतं. ही वेळेच्या अर्थाने टाईट शेड्यूल्ड फ्लाईट होती. कारण चार तासांपूर्वी अॅमस्टरडॅमहून निघालेली फ्लाईट पायलटसचे त्यावेळचे जास्तीतजास्त अलाऊड तास संपायच्या आधी परत पोचणं गरजेचं होतं.. हे नियम इतके कडक असतात की तासांची मर्यादा जास्त ओलांडली जात असेल तर फ्लाईट सस्पेंड करुन दुसर्या दिवशी विश्रांतीनंतर न्यावी लागते किंवा दुसरा क्रू मागवावा लागतो.. दोन्ही कंडिशन त्रासदायकच.. त्यामुळे डायव्हर्ट होताक्षणीच अतएव उशीराची नांदी होताक्षणीच व्हॅन झँटेन अस्वस्थ झाला. कधी एकदा फ्लाईट परत घेऊन जातो असं त्याला झालं.
आणखी एक गोष्ट.. व्हॅन झँटेन हा केएलएमचा सर्वात जुना, सीनियर आणि अनुभवी पायलट होता. तो केएलएमचा ट्रेनिंग इनचार्जही होता. त्याच्या हाताखाली पायलट्स शिकत आणि त्यांचं पासिंगही तो करत असे. कोपायलट क्लासलाही त्यानेच नुकतं बोईंगच्या फ्लाईंगसाठी असलेल्या रेटिंगमधे टेस्ट घेऊन पास केलं होतं. गेले सहा महिने तो सतत इतर पायलट्सना फ्लाईंग ट्रेनिंग देत होता आणि सिम्युलेटरच्या जगातून नुकताच प्रत्यक्ष फ्लाईंगकडे परत आला होता.
….
….
आता दुसर्या विमानाविषयी..
हे पॅन अॅम क्लिपर लॉस एंजेलिसहून निघून न्यूयॉर्क (जेएफके) मार्गे ग्रॅन कॅनेरियाकडे येत होतं. जेएफकेला नवा फ्लाईट क्रू आला..त्यामुळे ते तसे फ्रेश होते. त्यांना जेव्हा कळलं की आपल्याला ग्रॅन कॅनेरियातल्या बॉम्बथ्रेटमुळे टेनेरीफला थोड्या वेळासाठी डायव्हर्ट करताहेत, तेव्हा त्यांनी विचार करुन असं म्हटलं की “आम्हाला हवेतच घिरट्या घालत ग्रॅन कॅनेरिया एअरपोर्टच्या जवळ राहू द्या. एअरपोर्ट पुन्हा चालू झाला की आम्ही लँड करतो.” पण ग्रँड कॅनेरिया एअरपोर्टने ते मानलं नाही. त्यांना विमान टेनेरीफला वळवावंच लागलं.
पॅन अॅम क्लिपर टेनेरीफला उतरलं तेव्हा आधीच चिक्कार विमानांची तिथे गर्दी झाली होती. या गर्दीमुळे पार्किंग एरिया (एप्रन) भरून गेला होता आणि रनवेकडे जाणार्या मार्गांवर म्हणजेच टॅक्सीवेजवर विमानं पार्क करुन ठेवायची वेळ आली होती… यामुळे झालं काय की रनवेच्या ज्या टोकाकडून टेकऑफ सुरु करायचा त्या टोकाकडे जाण्याचा नेहमीचा मुख्य अंतर्गत टॅक्सीवे बंद झाला होता.
टेनेरीफच्या त्यावेळच्या विमानतळाची साधीशी आकृती काढायचा मी प्रयत्न केला आहे. अर्थातच नॉट टू स्केल. शेप्सही तंतोतंत मुळीच नाहीत. फक्त कल्पना येण्यासाठी अतिसुलभ केलेली आकृती:

तर काय सांगत होतो?.. पॅन अॅम क्लिपर टेनेरीफला उतरलं तेव्हा आधीच चिक्कार विमानांची तिथे गर्दी झाली होती. त्यांच्या मागोमाग अजूनही विमानं उतरली आणि पॅनअॅम एकप्रकारे पार्किंगमधेच कोंडलं गेलं.
केएलएम र्हाईन आधी तिथे पोचून उभं होतंच. केएलएम र्हाईनवर बरेच सिनियर सिटिझन्स होते आणि ते चांगलेच कंटाळले होते. मुख्य म्हणजे पायलट इन कमांड व्हॅन झँटेन.. त्याच्या मनात चक्र चालू होतं. त्याचे विचार मी आपले अंदाजाने मांडतोय..
“ग्रॅन कॅनेरिया एअरपोर्ट खुला झाला की इथून तिथे जायचं. तिथे अशीच खोळंबलेली खूप विमानं एकदम येणार. क्लिअरन्सेसचे घोटाळे होऊन खूप वेळ जाणार. त्यात तिथे ग्रॅन कॅनेरियाला परतीसाठी फ्युएलही भरायचंय. ते मिळायला अशा गर्दीच्या माहोलात किती वेळ जाईल कोण जाणे असेही इथे अडकलोच आहोत तर इथेच परतीचं पूर्ण फ्युएल भरुन घेऊ..म्हणजे ग्रॅन कॅनेरियाला वेळ न काढता तडक परत निघता येईल. ड्यूटी अवर्सच्या लिमिटमधे अॅमस्टरडॅमला पोचलो नाही तर परत कंपनीत इश्यूज.. कारवाई…किंवा फ्लाईट लांबवा..इथेच विश्रांतीसाठी अडकून पडा.. पीडाच नस्ती..”
मग कॅप्टन व्हॅन झँटेननं तिथेच म्हणजे टेनेरीफलाच इंधनाचा टँकर बोलावला आणि पंचावन्न हजार लिटर इंधन भरुन घेतलं. त्याचं वजन साधारण चाळीस टन होतं. म्हणजे विमान चाळीस टनांनी जड झालं. पण ग्रॅन कॅनेरियाला ते इंधन भरत बसण्याची दिरंगाई वाचली.
अर्थातच हे फ्युएल भरायला बराच वेळ लागला..
इकडे ग्रॅन कॅनेरिया एअरपोर्ट खुला झाला होता आणि एकेक फ्लाईटस त्या दिशेने सोडल्या जायला लागल्या. त्यात पॅनअॅम क्लिपरचा नंबर आला..
आता परत त्याच विमानतळावर पॅन अॅम क्लिपर आणि केएलएम र्हाईनची पार्किंग स्थिती बघू. मेन टर्मिनल एप्रनवर दोघांनाही जागा नव्हती. त्यामुळे ते अशा रितीने उभे होते की पॅनअॅम क्लिपरचा रनवेवर जाण्याचा पूर्ण आतला रस्ता विमानांच्या गर्दीने बंद झाला होता. अशावेळी रनवेच्या दुसर्या टोकाकडून रनवेवर जाऊन रनवेवरच उलट दिशेने प्रवास करत टेकऑफ पॉईंटकडे पोचण्याचा एकच मार्ग उपलब्ध राहिला होता. या प्रकाराला बॅकट्रॅकिंग म्हणतात. आपणही खूपदा हे पाहिलं असेल, एक प्रवासी म्हणून..
पण…
त्या मार्गातही व्हॅन झँटेनचं केएलएम र्हाईन बोईंग धोंड्यासारखं वाट अडवून फ्युएल भरत उभं होतं. दोन्ही पार्ट्यांनी टॅक्सीवेची बाजूची उरलेली फट मोजून पाहिली.. पॅनअॅमला बाजूने सटकण्यासाठी फक्त बारा फुटांचा क्लिअरन्स कमी पडत होता.. तेवढ्याने ते अडकत होते.
त्यामुळे अर्थात पॅनअॅम क्लिपरचा निघण्याचा पहिला हक्क आणि तयारी असूनही केएलएमचं फ्युएलिंग होईपर्यंत पस्तीस मिनिटं उगाच चुळबुळत थांबून रहावं लागलं.
ही रचना मी खाली दाखवायचा प्रयत्न केला आहे:

आता इथपासून घडणार्या घटना, विशेषतः संभाषण, मी तपशीलवार देतोय. ते नीट लक्ष देऊन वाचा..मी टेक्निकल टर्म्समधे अडकू नये म्हणून मराठीत लिहितोय. जिथे मूळ शब्द महत्त्वाचे असतील तिथे ते मूळ भाषेत देईन..
फ्युएल भरुन होताक्षणीच केएलएमच्या झँटेनला निघण्याची घाई झाली. त्याने रनवेवर जाण्यासाठी क्लिअरन्सची बोलणी रेडिओवर सुरु केली..
केएलएम र्हाईनः “टेनेरीफ अॅप्रोच, (आम्ही) केएलएम ४८०५ (आहोत)
टेनेरीफ टॉवरः”के एल एम… अम्.. ४८०५..रॉजर.. (ठीकाय, बोला)
केएलएम र्हाईनः आम्हाला रनवे ३० वरून टेकऑफ करण्यासाठी (त्या टोकाशी पोचण्यासाठी) १२ वर बॅकट्रॅक करण्याची परवानगी हवीय..
…रनवे १२ आणि ३० हा फिजिकली एकच रनवे आहे. अर्थात १२ आणि ३० या अनुक्रमे १२० डिग्री आणि ३०० डिग्री दिशा (ढोबळमानाने पूर्व आणि पश्चिम) दाखवतात.
टेनेरीफ टॉवरः ओके..टॅक्सी करत (हळूहळू विमान चालवत) रनवेवर उलटे जा आणि डावीकडच्या तिसर्या एक्झिटने रनवे सोडा..(म्हणजे तिथून टॅक्सीवेवर या आणि फिरुन परत रनवेच्या टोकाशी निघा.. या संदर्भासाठी वरची एअरपोर्टची आकृती बघा..)
केएलएम: रॉजर सर.. आम्ही रनवेवर बॅकट्रॅक करतो आहोत. तिसर्या एक्झिटने परत रनवे सोडू ते आतल्या टॅक्सीवेने फिरुन परत त्याच रनवेच्या टोकाला निघण्यासाठीच.
टेनेरीफ टॉवरः (थांबा.. थांबा.) करेक्शन.. (तिसर्या एक्झिटला न वळता..) तसेच रनवेवरच जात रहा (आणि टोकाशी पोचलात की १८० डिग्री टर्न करुन वळून टेकऑफसाठी अलाईन व्हा)
केएलएम: रॉजर (ओके).. आम्ही रनवे न सोडता तसेच शेवटापर्यंत ट्रॅकबॅक करतो.
केएलएम (पुन्हा काहीसे कन्फ्युज्ड): टेनेरीफ टॉवर, आम्ही पहिल्याच डाव्या टॅक्सीवेने रनवे सोडून आत वळू का?
टेनेरीफः नाही नाही.. सरळ बॅकट्रॅक करत रहा.. रनवेच्या शेवटापर्यंत..
केएलएम: ओके सर..
…………..
आता केएलएम वरच्या आकृतीत दिलेल्या लाल मार्गाने रनवेवर बॅकट्रॅक करायला लागलं आणि टेनेरीफ टॉवरने वाट पहात बसलेल्या पॅनअॅम क्लिपरला साद दिली.. त्यांनी पॅनअॅमला वर दाखवलेल्या हिरव्या मार्गाने केएलएमपाठोपाठ बॅकट्रॅक करायला सांगितलं. पॅनअॅमने ती सूचना रिपीट करुन कन्फर्मेशनही घेतलं.
टेनेरीफ टॉवरः अफर्मेटिव्ह (हो..) रनवेवरच बॅकट्रॅक टॅक्सी करा आणि डावीकडे येणार्या तिसर्या एक्झिटने रनवे सोडा..(अर्थात तिथून आत शिरुन आतल्या टॅक्सीवेने रनवेच्या दुसर्या टोकाला पोहोचायचं आहे.. पुढच्या सूचना नंतर देऊ.. ) एक्झिटला रनवे सोडून आत वळलात की कळवा..
पॅनअॅम क्लिपरः “तिसरं एक्झिट.. ओके..”
मग क्लिपरच्या कॉकपिटमधे एकमेकांत जरा कन्फ्युजन झालं.. क्लिपरचा फ्लाईट इंजिनियर “तिसरं” एक्झिट म्हणत होता.. इन कमांडला थर्ड ऐवजी फर्स्ट ऐकल्यासारखं वाटत होतं. मग कोपायलट म्हणाला, “मी परत विचारतो.”
परत विचारल्यावर टॉवरने कन्फर्म केलं “थर्ड एक्झिट.. सर….वन. टू.. थ्री.. थर्ड…”
झाली… पक्की खात्री झाली…
आता थोडं हवामानाविषयी.. टेनेरीफ एका बेटावर असलं तरी एअरपोर्ट समुद्रसपाटीपासून दोन हजारहूनही जास्त फुटांवर आहे. तिथे नेहमीचे आकाशातले ढग ग्राउंड लेव्हलला दिसतात. बर्याचदा अचानक मोकळी हवा असताना एकदम मोठ्ठा ढग आला तर सर्व परिसर एकदम शुभ्रांधळा होतो. आत्ताही तसंच झालं होतं.. एक मोठ्ठा ढग येऊन पसरला आणि संपूर्ण एअरपोर्ट त्यामधे वेढला गेला. व्हिजिबिलिटी अचानक खूप कमी झाली.. केएलएम, पॅनअॅम क्लिपर आणि टेनेरीफ टॉवर यातले कोणीच कोणालाच दिसणं बंद झालं.. आंधळी कोशिंबिर.
बरं ही व्हिजिबिलिटी इतकी झपाट्याने बदलली की ती मोजून टेकऑफला बंदी करण्याची प्रोसीजरही सुरु होऊ शकली नव्हती.
आता पुढचा संवाद पाहू..
पॅनअॅमचं कॉकपिट.. इथे केएलएम आणि टेनेरीफ टॉवर या दोघांचं कम्युनिकेशन ऐकू येतंयः
टेनेरीफ टॉवर: रनवे सेंटरलाईन लाईट्स चालू नाहीयेत.. केएलएम आणि पॅनअॅम दोघांसाठी सूचना..
केएलएम: (ओके) मी नोंद घेतली आहे.
पॅनअॅमः मी क्लिपर. (मीही नोंद घेतली.)
मग पॅनअॅमच्या पायलटने आपापसात अशी शंकाही व्यक्त केली की रनवे सेंटरलाईन लाईट्स नसताना टेकऑफसाठी किमान आठशे मीटर व्हिजिबिलिटी हवी.. (इथे तर तीनशेच्याही खाली गेली होती..)
पॅनअॅम पायलट (कॉकपिटमधेच इतरांना उद्देशून): “हा बघा दोन नंबरचा (डावा टॅक्सीवे) गेला.”
केएलएम र्हाईन या वेळेपर्यंत रनवेच्या टेक ऑफ घेण्याच्या टोकाला पोचलं होता आणि उलट वळून टेकऑफसाठी तयार होत होतं.. पायलट आणि कोपायलटने टेकऑफचे चेक्स करायला सुरुवातही केली.
…आता इथपासून खर्या भयंकर म्हणता येतील अशा संभाषणातल्या गॅप्स पडत गेल्या.. इथे नीट लक्ष द्या..
के एल एम कोपायलट, पायलटला, व्हॅन झँटेनला उद्देशूनः “पण अजून आपल्याला टेकऑफ क्लिअरन्स नाहीये..(फक्त अलाईन होऊन रहायला सांगितलंय)
केएलएम पायलट (व्हॅन झँटेनः) नो.. आय नो दॅट.. गो अहेड.. आस्क..
केएलएम कोपायलट (टेनेरीफला) : टेनेरीफ टॉवर.. आम्ही टेकऑफसाठी तयार आहोत आणि (तुमच्या) एटीसी क्लिअरन्सची वाट पाहतोय.
टेनेरीफ टॉवर : टेकऑफनंतर तुम्ही फ्लाईट लेव्हल ९० मेंटेन करायची आहे. टेकऑफनंतर उजवा टर्न घ्या आणि ग्रॅन कॅनेरियाची अमुक रेडियल इंटरसेप्ट करा.. वगैरे तांत्रिक माहिती..
अशी माहिती आधी देऊन ठेवली जाते.. नंतर टेकऑफ क्लिअरन्सच्या वेळी देत बसायला वेळ नसतो म्हणून.
केएलएम कोपायलट (टेनेरीफला उद्देशून) ओके.. टेकऑफनंतर उजवा टर्न आणि फ्लाईट लेव्हल ९०… वगैरे..
केएलएम कोपायलटने सर्व थोडक्यात परत म्हणण्याचं कारण हे की अशी पद्धत आहे.. मिळालेल्या माहितीतली महत्त्वाची झलक पुन्हा वाचून दाखवायची असते.. यामुळे पोचही मिळते आणि डबल चेक होतो..
अजूनही टेकऑफ क्लिअरन्स मिळाला नव्हता..
पण क्लास, म्हणजे केएलएमचा कोपायलट ही केवळ माहितीची पोच देत असताना मेन पायलट व्हॅन झँटेनने टेकऑफ क्लिअरन्स मिळालाच असं समजून इंजिन पॉवरसाठी थ्रॉटल दाबला देखील…
टेनेरीफशी बोलताबोलता कोपायलट “क्लास”ने हे पाहिलं आणि काहीसा बावचळला.. पण झँटेनसाहेबांनी ऑलरेडी घोडे सोडलेत हे पाहून तो टॉवरला पोच देऊन संपताच (उगाच आपलं) म्हणाला “अँड वुई आर नाउ अॅट टेकऑफ”
“अॅट टेकऑफ” या शब्दरचनेला काही अर्थ नव्हता.. टॉवरवाल्याच्या दृष्टीने “अॅट टेकऑफ” म्हणजे “टेकऑफ पॉईंटवर उभे” असा अर्थ फारतर घेता आला असता.
तरीही तातडीने टेनेरीफ टॉवरवाला म्हणाला “स्टँडबाय फॉर टेकऑफ.. आय विल कॉल यू”.. (टेकऑफसाठी फक्त तयारीत रहा.. मी टेकऑफसाठी पुन्हा सांगीन..)
त्याचवेळी पॅनअॅम क्लिपर, जे अजून रनवेवर एक्झिट शोधत चालले होते, त्यांनीही तातडीने रेडिओवर घोषित केलं की “पण (अहो सर्वजणहो..) आम्ही अजून रनवेवरच आहोत..”
ही दोन्ही वाक्यं रेडिओवर प्रसारित झाली होती आणि ती “केएलएम”ने,म्हणजेच झँटेनने ऐकणं अत्यंत महत्त्वाचं होतं.
पण इथे नियतीचं षडयंत्र म्हणावं असा योगायोग झाला. “टेकऑफ साठी अजून क्लिअरन्स नाहीये, थांबा” अशा अर्थाचं टेनेरीफ टॉवरचं वाक्य आणि “आम्ही अजून रनवेवरच आहोत” ही पॅनअॅमची घोषणा, या अगदी एका वेळी झाल्या..
विमानाचे रेडिओ एकाच फ्रीक्वेन्सीवर चालतात. एकावेळी माईकचं बटण दाबून धरुन एकच व्यक्ती बोलते (ट्रान्स्मिट करते). त्याने ओव्हर म्हटलं आणि बटण सोडलं की इतरजण आपलं उत्तर देतात.
इथे टॉवर बोलत असतानाच तत्क्षणी पॅनअॅमने बटण दाबून आपली घोषणा केल्याने दोन्ही सिग्नलचा इंटरफिअरन्स झाला आणि किर्रर्र आवाजाची एक लहर तीन सेकंद रेडिओवर वाजली. त्यात दोन्ही वाक्यं झाकली गेली. कोणाचाच संदेश प्रक्षेपित झाला नाही. प्रत्येकाला वाटलं आपण बोललो.. पण केएलएमच्या कॉकपिटमधे नुसता गोंगाट ऐकू आला..
तोपर्यंत व्हॅन झँटेनने केएलएम विमानाच्या चारही इंजिन्सना पूर्ण पॉवर दिली होती..टेकऑफसाठी..
त्यानंतर लगेच टेनेरीफने पॅनअॅमला उद्देशून रेडिओवर म्हटलं: “पॅनअॅम, रनवे सोडलात की सांगा (रिपोर्ट व्हेन रनवे क्लिअर्ड)”
हे ऐकून पॅनअॅमने म्हटलं.. “ओके.. आम्ही (टॅक्सी वे सापडला आणि टर्न केला की..) रनवे क्लिअर केला की सांगतो..”
हे सुद्धा केएलएममधे सर्वांनी नीट ऐकलं असतं आणि खाडकन समजलं असतं तरी काहीतरी बरं घडलं असतं.. पण ..
हे शब्द टेकऑफला भरधाव सुटलेल्या अजस्त्र बोईंग केएलएम र्हाईनच्या फक्त फ्लाईट इंजिनियरने नीट ऐकले.. आणि तो भयशंकित मनाने आपल्या पायलटसाहेबांना, व्हॅन झँटेनला म्हणाला,”इज ही नॉट क्लिअर देन?” (तो अजून रनवेवरुन बाहेर गेला नाही की काय?)
“काय म्हणतोयस… ??” व्हॅन वैतागल्यागत म्हणाला..तो आधीच अधीर झाला होता.
पण क्षणार्धात लगेच अर्धवट समजून व्हॅन झॅंटेन म्हणाला.. “यप” .. (हो)
तरीही फ्लाईट इंजिनियर परत एकदा विचारता झाला..जस्ट फॉर क्लॅरिटी म्हणून असावं.. “इज ही नॉट क्लिअर.. दॅट पॅन अमेरिकन??”
इथे पुन्हा व्हॅन झँटेनने ठामपणे “हो” असं उत्तर दिलं.. त्याचा टोन असा होता की आता परत विचारणं शक्य नव्हतं.. दोबारा मत पूछना..फ्लाईट इंजिनियर गप्प बसला..
……………..
पॅनअॅम क्लिपर अजूनही रनवेवर सरपटत तिसरं एक्झिट शिधत होते. दाट ढगात काही म्हणता काही दिसत नव्हतं. इतक्यात पॅनअॅम पायलटला रनवेवर समोरून धुक्यातून येणारे प्रखर हेडलाईट्स दिसले.. ते केएलएमचे होते..ते झपाट्याने त्यांच्या दिशेने येत होते. प्रचंड प्रचंड वाढत्या वेगाने.. खरंतर अगदी जवळच होते ते..

“देअर ही इज.. लुक अॅट हिम..दॅट गॉडडॅम्ड सन ऑफ अ बिच इज कमिंग.. गेट ऑफ.. गेट ऑफ..” (तो येतोय.. हटवा आपलं विमान रनवेवरुन.. हटवा लवकर…)
जिवाच्या आकांताने पॅनअॅम क्लिपर पायलटने थ्रॉटल फुल पॉवरकडे दाबून डावीकडे शार्प टर्न घेतला.. रनवे सोडून बाजूच्या गवतात शिरुन जीव वाचवण्याच्या आशेने.. पण वेळच शिल्लक नव्हता.. इंजिन पॉवर वाढण्यातल्या लॅग टाईमच्या आतच केएलएम र्हाईन बेफाम वेगाने आलंच..
केएलएमच्या व्हॅन झँटेनला टेकऑफ रनच्या अगदी शेवटी अचानक दिसलं की पॅन अॅम रनवेवर वाटेत उभं आहे.. त्याने प्रचंड धसक्याने क्रॅश वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. टेकऑफ डिसिजन स्पीड ऑलरेडी पार झालेला होता.. आता टेकऑफ घ्यायलाच हवा.. अशीही टकरीआधी थांबण्याची शक्यता शून्यच होती. एकच मार्ग त्याला दिसला, तो म्हणजे विमानाचं नाक आधीच, प्रीमॅच्युअरली वर खेचायचं..
टक्कर टाळण्यासाठी त्याने कंट्रोल कॉलम खेचून केएलएम र्हाईनचं नाक इतकं वर केलं की मागचा शेपटीचा भाग रनवेला घासला आणि साठ फुटांहून जास्त अंतर घासत गेला. दोनतीन फुटी आणि साठ फूट लांब भेग रनवेत तयार झाली.. ठिणग्यांचा फवारा उडाला..
त्याच्या प्रयत्नांनुसार टेकऑफ झालाही. केएलएमचं नाक आणि पुढचं नोजव्हील पॅनअॅमच्या वर क्लिअर झालं..

पण…
मागच्या प्रचंड फ्युजलेज (बॉडी) आणि चार इंजिनांबाबतीत मात्र काही इलाज राहिला नव्हता.. ती पॅनअॅम क्लिपरमधे उजव्या अंगाने घुसली आणि चुथडा करत गेली.

केएलएमचा काही क्षण टेकऑफ झालासुद्धा.. पण पॅनअॅमच्या ओरबाडलेल्या धातूचा कीस केएलएमच्या इंजिन्समधे घुसला होता.. इंजिन्सना डॅमेजच इतकं झालं होतं की पुढे जाऊन दीडशे मीटर्सच्या आत केएलएम र्हाईन रनवेवरच परत कोसळलं.. आधी मिळालेल्या वेगामुळे फरपटत अर्धा किलोमीटर तुकडे होत आणखी पुढे गेलं.. व्हॅन झँटेनने तुडुंब भरुन घेतलेल्या चाळीस टन इंधनाने पेट घेतला आणि कोणताही पॅसेंजर वाचण्याची फार अंधुक झालेली आशा फुंकून टाकली.. एकूण एक म्हणजे दोनशे अठ्ठेचाळीस लोक ठार झाले.
केएलएम र्हाईनमधे बसलेली एक टुरिस्ट गाईड मुलगी… टेनेरीफला डायव्हर्ट झाल्यावर आपला बॉयफ्रेंड त्या बेटावर राहतो म्हणून फ्लाईट सोडून देऊन, सामान घेऊन ती तिथेच उतरुन गेली, त्याला भेटायला… केएलएममधली ती एकटीच वाचली….
पॅनअॅमच्या पॅसेंजर बसण्याच्या भागातले सर्वजण जागीच ठार झाले. पुढच्या भागातले थोडे लोक वाचले.. पण रनवेवरुन झटपट निघण्याचा प्रयत्न करताना फुल पॉवरवर ठेवलेली इंजिन्स आता बंद होईनात. कारण सर्व इंजिन कंट्रोल्स असलेला वरचा भाग केएलएमने उडवला होता.. काहीवेळ जागच्याजागी फुल पॉवरवर फिरत राहिल्यावर खिळखिळ्या झालेल्या इंजिन्सचे भाग सुटे व्हायला लागले आणि वेगाने हवेत फेकले जायला लागले. ते अंगात घुसून आधी जिवंत वाचलेली एक एअर हॉस्टेस ठार झाली..
वाचलेले लोक डाव्या पंखावर चालत आले आणि सुटकेची वाट पहात थांबले.. सुटकेला कोणीच येईना..
त्यात असे तुकडे भिरभिरत यायला लागल्यावर आणि आगीचा भडका उडायला लागल्यावर ते खूप घाबरले आणि उंच पंखावरुन खाली उड्या टाकल्या.. त्यात जखमीही झाले..
पॅनअॅमच्या सुटकेला तातडीने कोणीच का आलं नाही?.. कारण दाट धुक्यामुळे कोणाला आधी समजलंच नाही की नेमकं काय झालंय.. दोन विमानं यात खाक झाली आहेत हेच कोणाला कळलं नव्हतं. निव्वळ केएलएमचा टेकऑफनंतर लगेच क्रॅश झाला असं समजून सगळी मदत तिकडेच चालली होती.. अलीकडे रनवेवर पॅनअॅम जळताना दिसून ते केएलएमखेरीज आणखी एक वेगळं विमान आहे हे समजेपर्यंत खूप वेळ गेला.

पॅनअॅमवरचे तीनशे पस्तीस आणि केएलएमचे सर्व म्हणजे दोनशे अठ्ठेचाळीस मिळून पाचशे त्राऐंशी बळी गेले.
………………………
विमान इतिहासातली आत्तापर्यंतची सर्वात अधिक बळी घेणारी सर्वात मोठी दुर्घटना हीच आहे..
यात अर्थातच व्हॅन झँटेनची मुख्य चूक होती.. टेकऑफ क्लिअरन्स नसताना टेकऑफ घेण्याची..
पण…….. प्रत्येक घटकाने त्या विनाशात आपला सहभाग दिला..
कसा?
प्रयत्न करु.. मी मला जमेल तसे मुद्दे मांडतोय..
-ड्यूटी अवर्सविषयी व्हॅन झँटेनच्या मनावरचं दडपण..
-गेले सहा महिने ट्रेनिंगच्या वातावरणात, म्हणजेच सिम्युलेटरमधे काढून उड्डाणाकडे परतलेला झँटेन. ट्रेनिंगमधे तोच सर्वेसर्वा होता.. सिम्युलेटरमधल्या मॉक ट्रॅफिक कंट्रोल टॉवरचाही तोच इनचार्ज होता.. म्हणजे कर्ताधर्ता मीच, अशा वातावरणात, स्टँडर्ड प्रोसिजरची, टॉवरला गांभीर्याने घ्यायची सवय गेली असेल अशी शक्यता जास्त..
-कोपायलटने वापरलेली, वुई आर “अॅट टेकऑफ” आणि टेनेरीफ टॉवरने परिसादात वापरलेली “ओके” अशा दोन्ही अत्यंत संदिग्ध आणि नॉन स्टँडर्ड शब्दयोजना.. अॅट टेकऑफ म्हणजे “टेकऑफ रन चालू”, की “टेकऑफ पोझिशनवर थांबलेला”.. …”ओके” म्हणजे काय? “समजलं” अशा अर्थाने, की त्या संदिग्ध “टेकऑफ”ला परवानगी?
- व्हॅन झँटेनची एकमेवाद्वितीय सिनियॉरिटी.. कोपायलट त्याचाच शिष्य, आणि इंजिनियर खूप ज्युनिअर.. त्यामुळे मनात आलेली शंका एकापेक्षा जास्त वेळा मांडण्याचं धैर्य कोणालाच नाही.. इंजिनियरने “इज ही नॉट क्लिअर देन, दॅट पॅन अमेरिकन?” असं विचारल्यावर आणि झँटेनने वैतागल्यागत आणि ठासून “हो” म्हटल्यावर तो इंजिनियर एकतर कन्व्हिन्स झाला असावा किंवा पुढे बोलण्यात अर्थ नाही असं समजला असावा.
-दाटून आलेला प्रचंड ढग आणि एकदम नाहीशी झालेली व्हिजिबिलिटी..कोणीच कोणाला दिसेनासे होणं.. आणि टेनेरीफला त्यावेळी रडार नसल्याने फक्त आणि फक्त पायलट्सच्या तोंडी रिपोर्टसवरुनच त्यांची नेमकी पोझिशन टॉवरला कळणं.
-शेवटच्या क्षणी सर्वांना वाचवू शकतील असे दोन संदेश.. “केएलएम, तुम्हाला अजून टेकऑफ क्लियरन्स नाहीये.. वाट पहा”, आणि पॅनअॅमचा, “अजून आम्ही रनवेवरच आहोत” .. हे दोन्ही संदेश एकावर एक ओव्हरलॅप होऊन नुसता गोंगाट व्हावा..आणि केएलएमला ऐकूच न जाणं..
-व्हॅन झँटेनने नंतर वेळ वाचवण्यासाठी घेतलेलं चाळीस टन इंधन.. यामुळे क्रॅशनंतर आगीचं प्रमाण कैकपटींनी वाढलंच, पण त्याहीपेक्षा वाईट म्हणजे हे वाढीव वजन नसतं तर टेकऑफ आधीच झाला असता आणि पॅनअॅमशी टक्कर टळली असती..
-व्हॅन झँटेनने टक्कर टाळण्यासाठी जे आधीच विमान तीव्रतेने वर उचललं, त्यामुळे मागची शेपटी रनवेत घुसून घासत गेली. याचा परिणाम म्हणून उलट वेग थोडासा कमी झाला आणि टेकऑफ आणखी लांबला..ही वर खेचण्याची प्रतिक्रिया आली नसती तर कदाचित टेकऑफ होऊन गेला असताही..
…………………….
इतक्या वाईट अॅक्सिडेंटमधून निष्पन्न काय झालं…??
-रेडिओ कम्युनिकेशनमधे क्रांतिकारक म्हणावेत असे बदल झाले. “ओके”, “अॅट टेकऑफ” अशा मनाला येईल त्या शब्दांत संभाषण करणं त्यागलं गेलं. शब्दरचनेचे नियम कडक झाले.. एक उदाहरण द्यायचं तर “टेकऑफ” हा शब्द फक्त आणि फक्त फायनल टेकऑफ क्लिअरन्सच्या वेळीच वापरण्याचा नियम आला. त्याआधीच्या सर्व स्टेजेसना “डिपार्चर” हा शब्द वापरणं बंधनकारक झालं. “लाईन अप अँड वेट” असा स्पष्ट “वाट पाहण्याचा आदेश आता दिला जातो.
-दोन व्यक्तींनी रेडिओवर एकाच वेळी बटण दाबून बोललं तर जो कर्कश गोंगाट होतो, तो टाळण्याची टेक्नॉलॉजी निघून ती प्रचलितही झाली. यामधे कोणीही बोलत असताना त्याचवेळी दुसर्याने बटण दाबून बोलायचा प्रयत्न केला तर नंतर बटण दाबणारा संभाषणातून “ब्लॉक” केला जातो. त्यामुळे गोंगाट होत नाही.
-एकत्र, एकमताने निर्णय घेण्याचं ट्रेनिंग (कॉकपिट रीसोर्स मॅनेजमेंट) हे पायलट ट्रेनिंगचा भाग बनवण्यात आलं. यात हायरार्की आणि प्रेशर मधे न आणता एकमेकांशी म्युच्युअल कन्सेंटने सर्व कृती करण्याची पद्धत बनली.
-नुसतं ओके किंवा रॉजर म्हणून रेडिओसूचनेची पोच देण्याऐवजी मुख्य आकडे आणि मुद्दे पुन्हा उलट वाचून दाखवण्याची पद्धत अत्यावश्यक केली गेली..
…………………………….
विमान अपघात म्हणजे आकाशात घडणारी गोष्ट अशी समजूत करुन घेणार्या आपल्यासाठी ही घटना हे सांगते की जगातली सर्वात वाईट विमान दुर्घटना टेकऑफच्याही आधीच…जमिनीवरच घडली आहे..
ताज्या प्रतिक्रिया