सुगरण..
ऑक्टोबर 31, 2011 11 प्रतिक्रिया
दोनतीन हॉटेलं वाईट निघाल्यामुळे आता पुढचं किमान बरं निघावं अशी इच्छा होती. लाऊंज, बिस्त्रो, फाईन डाईन, कॅफे अशा टाईपच्या हॉटेलिंगमधून ब्रेक घेऊन एखाद्या झणझणीत आणि खानावळवजा ठिकाणावर धाड टाकायची ठरवली.
कुठेतरी ऐकलेल्याच्या आठवणीवरून पुण्यात पेरुगेट पोलीस चौकीजवळ असलेलं सुगरण गाठायचं ठरवलं आणि गल्ल्या शोधत तिथे पोहोचलोसुद्धा..
एका गाळ्याएवढा एंट्रन्स दिसत होता. माझ्यासारख्या प्रशस्त माणसाला बसायलातरी पुरेशी रुंदी असलेली जागा आत असेल का असं वाटत वाटत आत शिरलो. वरती बोर्ड लावला होता त्यावर “सुगरन्स कोल्हापुरी नॉनव्हेज” असं लिहिलं होतं.

दारातच असलेल्या काउंटरवर “क्षमस्व, जेवण संपले” अशी पुणेरी आहारगृहात आवश्यक अशी लहानशी पाटी ठेवली होती. सुदैवाने “जेवण संपले” ची बाजू आतल्या दिशेने होती. याचा अर्थ जेवण चालू होतं. माझं नशीब चांगलं होतं.
आत शिरलो तर एक जेवणाची छोटी खोली दिसली. त्यात बसायला काहीशी जागा होती.

पण ती खोली ओलांडून आत जाताच बरीच ऐसपैस अंगणासारखा मोठ्ठा ओपन एअर जेवणाचा एरिया दिसला.

स्थानापन्न होऊन मेनूकडे नजर टाकली. “सुगरण”चं ब्रीदवाक्य असं होतं की, “फक्त तिखट म्हणजे कोल्हापुरी नव्हे, कोल्हापुरी ही एक चव आहे..” हे वाक्य मेनूवरही होतंच.
मेनू छोटाच होता. बराचसा भर कोल्हापुरी पद्धतीच्या चिकन आणि मटणावर दिसत होता. फिशचाही वेगळा सेक्शन होता. थाळी किंवा आवडते पदार्थ वेगवेगळे मागवण्याची सोय दिसत होती.
-गावरान चिकन करी
-गावरान चिकन फ्राय
-गावरान चिकन हंडी
-गावरान चिकन बिर्याणी
-पापलेट आणि सुरमई फ्राय
-पापलेट आणि सुरमई करी
व्हेज लोकांसाठी थाळीचा ऑप्शन अजिबातच नव्हता. एखाद दोन व्हेज भाज्या आणि त्यासोबत चपाती, एवढ्यामधेच व्हेजवाल्यांची सोय केली होती. याचाच अर्थ व्हेज व्यक्तीला इथे घेऊन येण्यात काहीही अर्थ नाही.
पुरेपूर कोल्हापूर किंवा अन्य कोल्हापुरी हॉटेलांतली नॉनव्हेजवाल्यांनाही मोहात पाडेल अशी व्हेज थाळी आठवली. पुरेपूर कोल्हापूरवाल्या व्हेज थाळीचा फोटो इथे उगीच रेफरन्ससाठी.

नॉनव्हेज थाळीचे मात्र इथे भरपूर प्रकार होते. अधिक संशोधनांती असं लक्षात आलं की मला हवेसे वाटणारे त्यातले पदार्थ एकत्र करुन तिथे ऑलरेडी एक “कोल्हापुरी स्पेशल थाळी” होतीच.
मग टेस्टिंग सुरू झालं..
सोलकढीने सुरुवात. इथे स्टीलच्या साध्या ग्लासातून थंड सोलकढी समोर आली.

या सोलकढीला मी दहापैकी अकरा मार्क्स देऊ इच्छितो, कारण इतकी परफेक्ट सोलकढी मिळणं हे भाग्याचं लक्षण आहे. नॉर्मली मिरमिरणारी, आंबट होत चाललेली, अति तिखट किंवा पाणी वेगळे झालेली अशी असण्याची शक्यता बरीच असते. पण अशी ताजी एकजीव आणि घशाला परफेक्ट हवी तेवढीच “लागणारी” सोलकढी फार कमी वेळा प्यायलो आहे.
मग एक चिकन फ्राय मागवून पाहिलं.

मऊ शिजलेलं चिकन. पण मसालेदार आणि चमचमीत टेस्ट होती. केएफसीवर पोसलेल्या जिभांना झटका देणारं हे रसरशीत फ्राईड चिकन होतं.
मग एकामागून एक ट्रायल्स चालू झाल्या. सुकं मटण.. हेही अत्यंत मस्त मऊ शिजलेलं होतं. रबरासारखं वातड चिकन किंवा मटण शिजवणार्या हॉटेलांविषयी कायमची अढी मनात बसते आणि उलट नीट आवश्यक तेवढं शिजलेलं मांस वाढणार्यांविषयी मनात कायमची आवड तयार होते.
सुक्के मटण:

गरमागरम कोल्हापुरी मटणरस्सा:

मटणात मसाल्याचं आणि तेलाचं प्रमाण सढळ होतं.. पण आवडेल इतकंच. ढप्पळभर तवंग नाही. जस्ट परफेक्ट.
या दोन्ही मटणांत कोल्हापुरी चव अगदी पुरेपूर उतरली होती. त्यासोबत भाकरी आणि चपातीचा ऑप्शन होता. मटणासोबत जाडजूड आणि गरम चपाती हा माझा नेहमीचा चॉईस असल्याने तोच घेतला. चपाती (अशा सणसणीत प्रकाराला पोळी म्हणवत नाही) ही अगदी गरम आणि मटणासोबत लागते तश्शी जाड पण खुसखुशीत होती. मटणरस्सा जरा तिखट होता. पण कोल्हापुरात अनेक ठिकाणच्या खानावळींमधे यापूर्वी खाल्लेला रस्सा आठवून त्यामानाने हा बराच स्केल डाऊन केलेला वाटला.. आणि ते चांगलंच होतं. खातानाच आगीचा बंब बोलावण्याची इच्छा होणे ही माझ्यामते चांगल्या अन्नाची खूण नव्हे. त्या तिखटानेही मजा यायला हवी.. जीव घाबरा होऊ नये..
या कसोटीला इथलं मटण उतरलं.
पांढरा आणि तांबडा रस्सा हा कोल्हापुरी जेवणाचा जीव. तो इथे अनलिमिटेड उपलब्ध होता. वाफाळणारा गरमागरम रस्सा पुन्हापुन्हा आणून वाढत होते. तांबडा रस्सा अफलातून टेस्टी होता. पांढर्या रश्श्यामधेही एरवी हमखास कमी किंवा जास्त पडणारी लवंग इथे योग्य प्रमाणात घातलेली होती आणि त्याचा सुखद होईल इतपतच स्वाद आणि चटका घशाला लागत होता.
तांबडा आणि पांढरा रस्सा:

थाळीमधे भाताचेही एकदोन ऑप्शन्स होते.
बराच वेळ हे झणझणीत खाल्ल्यावर तोंड भाजल्यामुळे काहीतरी गोड मागवण्याची इच्छा झाली. तसं वेटरला बोलल्यावर मला त्याने स्पष्ट सांगितलं की इथे कोणतीही स्वीटडिश मिळत नाही. काही म्हणजे काही नाही.. हवे तर कोल्ड्रिंक घ्या.
यांना बहुतेक आपली झणझणीत चव जिभेवर दीर्घकाळासाठी घेऊनच गिर्हाईक हॉटेलबाहेर पडावे अशी इच्छा असावी. काहीच गोड नाही हे काही मला आवडलं नाही.
या उपरिनिर्दिष्ट बर्याचश्या डिशेसचं कॉम्बिनेशन असलेली ही स्पेशल मटणथाळी:

या थाळीत छोट्या वाटीत खिमाही देतात. तो काही मला खास उल्लेखनीय वाटला नाही.
व्हेज लोकांसाठी खानापूर्ती. पनीर बटर मसाला:

हे ठिकाण रेकमेंड करण्याविषयी:
नॉनव्हेज अन्न अत्यंत टेसदार. पैसा वसूल.
किंमती अत्यंत वाजवी. सर्वात उच्च थाळीही दोनशेमधे. बाकीच्या थाळ्या शंभर ते दीडशे.
मात्र, व्हेज पार्टनर सोबत असेल तर इथे जाऊ नका. लहान मुलांनाही फारसं झेपेल असं वाटत नाही. “पुरेपूर कोल्हापूर्”मधे खास लहान मुलांसाठी थाळी मिळते. हे सुगरणवाल्यांनी घेण्यासारखं आहे.
स्वीटडिश नसल्याने आग आग होत असलेलं तोंड घेऊन बाहेर पडावं लागतं. ते आवडत असेल तर पसंद अपनी अपनी.. पण तरी हे लक्षात ठेवा आणि सोबत एखादी आंबावडी, चॉकलेट वगैरे ठेवून आत जावा.
बाकी “सुगरण” हंड्रेड परसेंट रेकमेंडेड….
………………

Can you please give the exact location?
WOWW!! TONDALA PANI SUTTLE, KUTHE AHE PUNE MADHE HAY HOTEL??
Detail patta sanga…me pan javun yeto….photo baghun tondala pani sutlay yar….
Dear all..
Thanks a lot for responses.
Hee jaagaa Sadashiv pethet, Narayan pethe javal aahe. Perugate police chowki shodhun kadhu shakalaat tar tithun 50 pavale dur aahe fakt..
आजच जावून बघतो. धन्यवाद. अस काही असले तर कळवत जा
जरुर जरुर.. काही खास आवडलं /नावडलं तर ब्लॉगवर लिहीनच… लोभ असावा.. धन्यु..
सुगरन्स कोल्हापुरी नॉन वेज
सदाशिव पेठ शेडगेवाडी
पेरूगेट पोलीस चौकीकडून टिळक रस्त्याकडे जाताना उजव्या बाजूला
कॅनरा बँक जवळ
टिळक रस्त्याकडून येताना : टिळक स्मारक मंदिरा समोरून आत जा. डाव्या हाताला आधी कॅनरा बँक न लगेच हे हॉटेल आहे.
अनिकेत.. सविस्तर माहितीसाअठी आभार.. उशीर झाला खूप उत्तर द्यायला.. क्षमस्व…
Ka ugach mala mahendrajincha blog waachlyasaarakh wattay kon jane…pan Sugran owes a visit. Mjhyasaarkhya ‘khanari’ la tar jaaylach hav.
हॅ हॅ हॅ.. आभार्स.. जाऊन ये लवकर.. पण पुण्याला गेलीस की आणि तरच… एरवी आपल्याइथेही मस्त कोल्हापुरी हॉटेले आहेत गो..
खास… पुण्याला गेलो की “सुगरन्स” भेट नक्की.