छोटीसी बात..

..न जाने क्यूं.. होता है ये जिंदगी के साथ..
अचानक ये मन.. किसीके जाने के बाद.. करे फिर उसीकी याद.. छोटी छोटीसी बात..

तिचं आवडतं गाणं… आणि “काय जुनी गाणी ऐकतेस..?”, असं म्हणत म्हणत का होईना पण तिच्या नादाने ऐकून नादावलेला मी.

लताचे सूर समोरच्या समुद्रासारखे.. पुन्हापुन्हा लाटा बनून आपटणारे..

किसीके जाने के बाद..
करे फिर उसीकी याद..

पण मग एकदम तो सगळा काळ उलटून अंगावर येतोय असं वाटलं.. समोर आत्ता खळखळणारी छोटीशी लाट एकदम चाळीस फुटाची बनून अंगावर यावी तसा..

गाणं एफएमवर लागलेलं असतं तर बंद करुन ती लाट थोपवता आली असती.. पण मनातच गुणगुण वाजणार्‍या गाण्याचं काय? बंद कसं करु? गुणगुणीतून एकदम भण्ण भण्ण असं व्हायला लागलं तर?

जिवाच्या आकांताने उठल्यासारखा वाळूतून उठलो.. माणसांच्या वस्तीत पोचलो असतो की सुटलो असतो.. वाळूत पळताही येत नाही.. मग पायात पेटके येतील एवढ्या जोराने पाय रेटत वाळू पार केली आणि डांबरी रस्त्यावर आलो.. डांबरी रस्ता सेफ.. नो मेमरीज..नो लाटाबिटा..

शहाळेवाला..

लक्ष दुसरीकडे घालवायचंय ना? मग हे करुन बघू..

“ए दोस्त.. मलईवाला दे रे एक.. बडा दे ना भाई.. कैसा छोटा निकालता है रे देखके..”

….

ती माझी का झाली नाही? काही अघटित घडलं होतं? की सगळं छान चाललेलं असताना कोणी येऊन सांडलं सगळं?

तसं काही नव्हतंच.. मी तिला कधी विचारलंच नाही..

मी गांडू होतो? तसंही वाटत नाही..

कदाचित माझंच नशीब इतकं वाईट होतं की मला तिच्याशिवाय राहणं इतकं नकोसं होईल अशी जाणीव होईहोईपर्यंत तिचं लग्न आणि पोरंही होऊन गेली…

मी फार हळूहळू प्रेमात पडलो काय तिच्या? स्लो पॉयझन?? आणि मधल्या काळात मला त्याची तीव्र जाणीव कधीच झाली नाही? मी माझ्या मनात तिला घोळवत राहून मनातच अफेअर करत राहिलो? आणि प्रत्यक्षातल्या तिला दूरच ठेवली?

ती तर मजेत आहे तिच्या घरी.. तिचा नवरा आणि पोरं..दोन दोन..

मग ठीकच आहे ना.. ठीक आहे तर मग आत्ता इतल्या वर्षांनंतर ही धगधग कसली.. आता का अनावर उलटीसारखं वर येतंय सगळं? काळाने कमी होण्याऐवजी चटका वाढत कसा जातोय? ती हवीच.. काही झालं तरी हवी हा कसला भलता रेटा मनाचा..

काही कळत नाही.. कसलाच तर्क चालत नाही.. आणि आता काय करु या विचाराने डोक्यातला मेंदू..

शहाळ्यात सर्रकन सुरी आणि मलई बळ्ळकन बाहेर.. शी… मेंदू..बाहेर येईल आता विचार करुन…

नको. शहाळं नको..

“नही चाहिये भाई… बराबर नही है तुम्हारा नारियल.. सडा है साला.. “

“अर्रे..मैं खराब है बोला तो खराब है.. कस्टमर मैं है के तू?? .. तुम्हारा पैसा ले लो ना तुम..”

आता पटपट लॉजवर जायला पाहिजे.. एक गोळी जिभेवर चघळली की लॉजपर्यंत पोचेपर्यंत ती लाट विरुन जाईल..

खिशात गोळी नाही.. संपल्याहेत गोळ्या आणि नवीन स्ट्रिप घ्यायला विसरलो कसा च्यायला??

एकावेळी एकच स्ट्रिप.. तीही प्रिस्क्रिप्शनशिवाय इथे मिळणार नाही.. प्रिस्क्रिप्शन लॉजवर.. व्हॉट द फक.. ते खिशात ठेवण्याइतका पण मी भानावर नसतो..

नेहमीच्या सन मेडिकोपर्यंत जायला पाहिजे.. तो प्रिस्क्रिप्शनशिवाय एक स्ट्रिप देईल..अ‍ॅटलीस्ट एक गोळी सुट्टी.. पण त्यासाठी पण लॉजच्या अर्ध्या वाटेपर्यंत जायला पाहिजे.. विनागोळी..

मग ती लाट?? … लाट जाणार आहे.. डॉक्टरांनी स्वतःला समजावायला सांगितलंय.. स्वयंसूचना..

ती फक्त भीतीची लाट आहे..ती जाईल.. तिला महत्त्व द्यायचं नाहीये..

आणि आता तर डांबरी रस्ता आहे.. वाळूपण नाही..पटकन पोचता येईल..एकदा गोळ्या मिळाल्या की झालं. लॉजचा एक जिना.. की मग बस्स.. खोली लपेटून झोपून टाकू.. झोप झाली की होईल रिसेट..

..लॉजपर्यंत पाय पुढे पुढे टाकत राहायला पाहिजे.. पावलं मोजता येतील हवीतर…

……………………

पोचलो सन मेडिकोपर्यंततरी.. लाट ओसरल्यासारखी वाटतेय आता.. पण स्ट्रिप घेऊन ठेवायला हवी..

“ए छोटे, झॅपिझ दे एक स्ट्रिप..”

….

“अरे मेरा हमेशा का मेडिसिन है रे.. पूछ तेरे बॉसको.. मालिक.. बोलो तुम्हारे लडके को एक स्ट्रिप देनेको..”

…..

स्ट्रिप हातात आली की आधार होतो एकदम.. तेवढ्यानेच बरं वाटायला लागतं..

आता लॉजवर पोचायचं एवढंच काम राहिलंय..

पण लॉजवर पोचलो तरी जरावेळाने भूक लागेल.. रात्री पोटात वेठ वळले की झोप येतच नाही.. मग आत्ता खाणं पटकन उरकून घेऊ काय?

उभ्याउभ्यापण चालेल..

“एक मैसूर मसाला दे.. मस्का ज्यादा डाल जरा….”

चर्र…

मोकळा आहे डोसेवाला म्हणून बरं, नाहीतर किती वेळ वेटिंग..

……….

………

मस्तच केलाय डोसा.. याचा नेहमीच छान असतो..

“और एक ऐसाही बनाव.. मस्का डाल हां ज्यादा.. पहेले में बोलके भी कम डाला रे तूने..”

गबागब खाणार आज तेच्यायला… बरं वाटतंय.. खूप खूप बरं..

खाल्लं की मस्त… म्हणजे खाताना सगळे त्रास मागे पडतात.. टाईमप्लीज्ज… लहानपणच्या खेळात असायची की.. तशी..

पण खाणं कधीतरी संपणार.. पोट तट्ट होणार.. मग??? मग पुन्हा रिकामे.. पुन्हा काहीतरी कुरतडत बसणार मनाला.. जितका वेळ जमेल तितकं खायचं.. मग पुढे बघू..

…………

…………

तडस लागते पोटाला एवढ्यानेच आजकाल..

चलो चलो भई लॉजको चलो..

एक जिना चढायचा की दुसर्‍या जिन्याखालीच खोली..दुसरा जिना चढायचा प्रश्नच नाही..

मग मस्त अंधार करुन झोप काढायची..

……..

जिन्याच्याखालची खोली का होईना पण मिळालीय कमी रेटमधे.. नायतर काही खरं नव्हतं..

जिनाच अर्ध्या खोलीतून जातो.. लाकडी जिने आणि लाकडी फळीच्या भिंती असल्यामुळे इथे प्रत्येक जाणार्‍यायेणार्‍याची पावलं ठकाठक वाजतात..

सवय काय प्रत्येक गोष्टीची होते.. आता बरोब्बर कळतं कितीजण चढून गेले वर..

सगळी बॅचलर पोरं, नवीनवी नोकरी लागलेली नाहीतर झगडणारी.. मी एकटाच बेकार..

मी कधीच कोणाच्या ठकठकीने दार उघडत नाही.. मग ती पोरं समजतात की मी पिऊन लास झालोय आत म्हणून..

मी पितो.. अगदी रोज.. पण लास होत नाही.

मी टक्क जागा असतो.. पण दार उघडत नाही..

संध्याकाळी बाहेर येतो थोडावेळ.. झाडाला पार हल्ली कुठे असतो का? पण आमच्या लॉजमधे आहे..त्यावर बसतो..

या पोरांकडे पैसे मागायला लाज वाटते. पण कधीकधी मागितलेले बरे असतात.. साठवलेल्यातून किती महिने आणि किती वर्षं चालणार??

पुन्हा मोठा प्रॉब्लेम असा की मी बर्‍याचदा भानावर नसतो.. म्हणजे ते मगाशी एकदम घाबरलो तिच्या आठवणीने ते..समुद्रावर जायलाच नको होतं.. पण कधीतरी लक्षात येत नाही.. फिरत फिरत जाऊन बसलं की जरावेळाने लक्षात येतं की समुद्रावर बसलोय म्हणून.. मग तेवढ्यात भीतीची लाट आली तर धडपडून उठायचं.. आज झालंच की..

त्यात एवढं घाबरायची गरज नव्हती.. म्हणजे तिच्या बाबतीतल्या आठवणी येतात तेव्हा एकदम घुसमटायला होतं हे खरं.. जीव जाईल असं वाटतं हेही खरं.. पण …

किती वर्षं झाली त्याला आता.. शांत झाल्यावर कळतं ना ते.. पण ती लाट आली की सगळंच भान सुटतं..

सगळा गेलेला काळ एकदम अंगावर येतो.. एका सेकंदात सगळं होऊन संपावं तसं.. खूप भीती वाटते..

………..

हा आला आनंद.. माझ्या वर एक मजला.. तिथे त्याची रूम आहे.. लग्न करणार आहे आता.. जागा शोधतोय म्हणत होता.

पैसे हवेत.. मुख्य म्हणजे आज आणि उद्या बाहेर जायला धाडस होईलसं वाटत नाही. बँकेपर्यंत जायला होणार नाही.. आणि या पोरांना त्यांच्या नोकर्‍यांच्या वेळात बँकेत जायला सांगताही येत नाही..आणि ..गोळ्या तर आज आणल्या आहेत.. पण हाताशी पैसे ठेवायला हवेत..

बँकेत किती उरलेत ते बघितलं तर अजूनच भीती सुरू होते.. पुढेपुढे भीक मागण्याची वेळ येऊ नये अशी इच्छा तर आहे. पण हातात काही नाही.. जगावंसं वाटतं सालं.. जगावंसं वाटतं..

……….

“ए.ए.. आनंदा.. जरा एक शंभरची जुळणी होईल का रे..”

…..

“अडचण म्हणजे..जरा कणकण आहे कालपासून.. आज औषध आणीन म्हणतो शहाकडे जाऊन..शंभर बास..”

….

“थँक्स रे.. थँक्स…”

……..

……………..

खोलीत एकदम गार झालंय.. गारठाच..

थोडीशी घेतो..

साध्या दारुचंही मॅनेज होत नाही दिवसेंदिवस.. ओल्ड माँक स्वस्त म्हणून ती परवडायची.. एकदम आणून ठेवायचो.. पण आता एकदम रातराणी.. लोकल ब्रँडने पोटात आग पडते.. पण नाही घेतली तरी खोलीसुद्धा खायला उठते. फक.. हा फक शब्द या पोरांच्यातलाच.. बरा वाटतो..

……

तिच्याकडे एकदा गेलोही होतो की लग्नानंतर.. मोठ्या घरामधे रहात होती.. माझ्याने कधीच झालं नसतं एवढं मोठं घर..

गिफ्ट तरी काय नेणार.. तिचं लग्न झालेलं.. मग माझी चांदीची नक्षीदार डबी दिली तिला.. लहानपणापासून सांभाळून ठेवलेली एकच वस्तू होती.. त्यात लहानपणी वीसपंचवीस पैशाची नाणी साठवून ठेवायचो..आता रिकामी झाली होती.

ती दिली.. आठवण म्हणून..

पण तिला देताना खूप काहीतरी दिल्यासारखं वाटलं.. तिला समजलं की नाही कोण जाणे..

तिने मला जेवायला भात आणि कुळथाचं पिठलं केलं होतं.. कधीतरी मी आवडतं असं म्हटल्यामुळे ते लक्षात ठेवून…

तिचा नवरा दिसायला बरा होता पण टक्कल पडलेला..

त्याने जेवणाच्या ताटावर माझ्यासमोर बसून बोलताबोलता तिच्या खांद्याभोवती हात टाकून तिला जवळ घेतली..वाढायला उभी होती ती..

माझ्या घशाखाली भात उतरेना.. एकदम ताबा सुटेल आणि तिच्या नवर्‍याला काहीतरी करीन अशी भीती वाटली..

मी पाणी मागितलं आणि थोडावेळ भात चिवडून उठलो..

मेमरी आहे सगळी तश्शीच्यातश्शी.. शाबूत..

………

मला ती मिळाली नाहीच..

मला कोणीच मिळालं नाही..

ही पोरं मदत करतात..

पण माझं कोणीच नाही…

मला आपल्या घरात ठेवून घ्यायला कोणी नाही.

सगळे मागे मागे पडले आहेत..

ती मागे पडत नाही.. ती हवी होती..

आता बरेच घोट झाले.. झोप येत्येय ती त्यामुळेच असणार..

बाहेर ठकठक होतेय.. पैसे मागतोय कोणीतरी..

थोड्याथोड्या दिवसांनी मागतात कोणीकोणी असे पैसे परत..

आत्तातरी मी दार उघडणार नाही… वाजवू देत.. जरावेळ वाजवेल आणि जाईल..

काय समजेल तो….

समजेल की लेलेआजोबा पिऊन लास झालेत..झेपत नाही तरी पितो थेरडा..

समजूदेत..

……………

……………….

(एंड..)

6 Responses to छोटीसी बात..

  1. Ashwini says:

    एकदम मस्त, नचिकेत….पहिल्यांदा वाटलं….तुझंच स्वगत वगैरे आहे की काय!….एका प्रेमाच्या आठवणित अशी उध्वस्त झालेली माणसे अजूनही असतात का?

    • ngadre says:

      प्रतिक्रियेबद्दल धन्यु अश्विनी.
      नाही,माझं स्वगत नाहीये हे. पण एखाद्या लेलेआजोबांशी एकरुप होऊन क्षणभर मी असं लिहू शकतो. आपण सगळेच असं करु शकतो.
      इथे गेलेला काळ एकदम अंगावर आलेले “लेले” आहेत. “ती” म्हणजे एक लाट,अशाच अनेक गतकाळाच्या लाटा त्यांच्यावर आदळत असणारच.

  2. आल्हाद alias Alhad says:

    लेले आजोबा!

    पेटलायत की तुम्ही ब्लॉगवर…

    आणि नक्कीच असतात… असावीत… प्रेमाचा, वेदनांचा फॉर्म बदलेल फक्त… बाकी सगळं सेम… लाटाबिटा वगैरे. :)

  3. bolMJ says:

    जबरदस्त लिहिलयस…

  4. Saurabh says:

    बंधो!!! कातिल!!! आजोबा फक्त नावाला.. but seems like everyone’s story…

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 40 other followers