एअर क्रॅश – १ – वांद्रे समुद्र..
नोव्हेंबर 18, 2011 2 प्रतिक्रिया
विमानाचा टेकऑफ झाल्याबरोब्बरची काही मिनिटं क्रॅशच्या दृष्टीने खूप जोखमीची असतात. एकदा क्रूझ लेव्हलला पोचलं की ही शक्यता बरीच कमी होते.
टेकऑफच्या वेळी जमिनीचा विरोध सावरुन संपूर्ण वजन (फुल टँक इंधन घेऊन) हवेत उचलले जाण्याइतका स्पीड मिळवायचा असतो. त्यामुळे यावेळी सर्व इंजिनांची संपूर्ण ताकद वापरली जाते. फुल थ्रस्टमधे इंजिनात अचानक आणि फेटल बिघाड होण्याची शक्यता जास्त असते.
खेरीजही अनेक प्रॉब्लेम्स टेकऑफनंतर लगेचच्या काळात अपघाताला संधी म्हणून उपलब्ध असतात. हवेत उचलले गेल्यावर काही क्षणात लगेच परत खाली उतरण्याचा अवसर नसतो.. त्यासाठी लागणारी जागा, वेळ आणि प्रोसीजर करणं अशक्य असतं.
पण त्याखेरीजही क्रॅश होऊ शकतो.. म्हणजे इंजिनशी संबंध नसलेला.. नॅव्हिगेशनल अपघात.
१९७८ च्या नववर्षदिनीच संध्याकाळी मुंबैहून दुबईला निघालेलं एअरइंडियाचं (गॉड ब्लेस देम..) बोईंग..
बोईंग ७४७ दोनशे सीरीजचं विमान.. त्यात सुमारे सव्वादोनशे लोक .. क्रू धरुन..
मुंबईचा मुख्य रनवे दोनशे सत्तर डिग्री अर्थात पश्चिमेकडे तोंड केलेला आहे. मोजा शून्यापासून (उत्तरेपासून..)
बरोब्बर पश्चिमेकडे तोंड करुन टेकऑफ घेतल्यावर आधी दिसते परे ची रेल्वेलाईन आणि मग जुहूचा छोटा विमानतळ..
जुहू विमानतळाची भिंत चौपाटीला लागूनच आहे.. ती पार केली की अथांग अरबी समुद्र..

इथूनच त्या महाराजा बोईंगने टेकऑफ घेतला..
टेकऑफनंतर मिनिटभरातच त्यांना उजवा टर्न घ्यायचा होता.. तसाच नेहमी घेतला जातो. मग दिलेल्या उंचीपर्यंत चढत रहायचं आणि दुबईची दिशा पकडायची.. दुबईची म्हणजे तिच्या मार्गावर असलेल्या पहिल्या चेकपॉईंटची.
हा उजवा टर्न घेताना अर्थात विमान उजवीकडे कललं होतं (बँकिंग). तसं करावंच लागतं…
ते कललेलं विमान कॅप्टननं टर्न संपताना पुन्हा सरळ लेव्हलला आणलं. हेही अगदी नॉर्मलच..
पण सरळ लेव्हलला आल्यावरही त्याच्या समोरची आर्टिफिशियल होरायझन इंडिकेटर (एएचआय) ही तबकडी असं दाखवायला लागली की अजूनही विमान उजवीकडेच झुकलेलं आहे.
ए एच आय खाली दाखवलं आहे. आकाशात असताना पायलटला बर्याच वेळेला क्षितीज रेषा दिसत नाही. त्यामुळे आपलं विमान जमिनीला समांतर उडतंय की खाली नाक करून डाईव्ह करतंय की वर चढतंय हे पायलटला कळत नाही. क्षितीजाचा संदर्भ फार गरजेचा असतो.
म्हणून हे कृत्रिम क्षितीज जायरोस्कोपच्या मदतीनं तयार केलेलं असतं. निळं आकाश, ब्राऊन जमीन आणि छोटं विमान म्हणजे आपलं विमान..

आता एएचाआयनुसार विमान उजवीकडे झुकलंय असं दिसतंय पण आपल्याला तर ते सरळ लेव्हलमधे आहे असं वाटतंय अशा विचाराने पायलट करेक्टिव्ह अॅक्शन म्हणून विमान डावीकडे झुकवत झुकवत म्हणाला की “माझा एएचआय लुढकलाय वाटतं..”.. म्हणजे उजवीकडेच पडून राहिलाय अजून अशा अर्थाने..
हीच तबकडी कोपायलटसमोरही असते.. त्या साईडची तबकडी अगदी बरोबर चालली होती.. अर्थात तिच्यामधे विमान डावीकडे झुकलेलं दिसत होतं… कारण ते कॅप्टनच्या करणीने डावीकडे झुकतच चाललं होतं..
ते बघून को पायलट म्हणाला, “माझाही लुढकलेला दिसतोय..” म्हणजे डावीकडे पडलाय अशा अर्थाने.
पण दोघांनीही उजवा डावा असे शब्द न वापरल्याने कॅप्टनला वाटलं की कोपायलटच्या साईडचं यंत्रही असंच म्हणतंय की विमान उजव्या बाजूला झुकलंय.. झुकलंय म्हणजे उजवा पंख खाली आणि डावा वर.. असं..
बाहेरच्या काळोखात क्षितिजाचा काहीच अंदाज येत नसल्याने कॅप्टनने उजवा झुकाव दाखवणार्या तबकडीनुसार विमान डावीकडे झुकवत करेक्शन करत रहायला सुरुवात केली.
बाहेरून कोणी बघत असता तर त्याला दिसलं असतं की विमान डेंजरसली डावीकडे झुकलं आहे.. विमानाच्या आतमधे अंधारामुळे कोणालाच प्रत्यक्ष अँगलचा अंदाज नव्हता. काहीतरी कारणाने विमान सारखं उजवीकडे कलतंय असं समजून कॅप्टन कंट्रोल कॉलम डावीकडे दाबत होता.. दाबत होता.. पुन्हा पुन्हा. आणि तो या अॅक्शनला हातातला कंट्रोल कॉलम आणि पायातले रडर पेडल यांनी नीट को-ऑर्डिनेट करुन करत असल्याने गुरुत्वाकर्षणाची खेचही कोणाला पोटात जाणवली नाही.
पण..
त्याच्या आधीच विमानाची लेफ्ट बॅंक (डावा झुकाव) मर्यादा ओलांडून गेला आणि विमान स्पायरल डाईव्हमधे शिरलं. त्यातून रिकव्हर होण्याइतका वेळ आणि उंची शिल्लक नव्हती..
काही कळून कंट्रोल व्हायच्या आत विमान गरगरत तुफान वेगाने खाली आलं. वांद्र्याच्या किनार्याजवळ पण समुद्राच्या आत दोनतीन किलोमीटरवर पाण्यात घुसलं आणि तुकडे तुकडे होत समुद्रतळाशी गेलं..
पायलट्सच्या मागे एक फ्लाईट इंजिनियर बसत असे.. त्याच्याजवळही असं इंस्ट्रुमेंट पॅनेल असायचं. अजूनही काही विमानांत असतं.
त्याला काहीतरी शंका आली आणि त्याने कॅप्टनला स्वतःसमोरचा एएचआय बघा.. असं म्हणण्याचा करण्याचा प्रयत्न केला..
पण त्याला माहीत नव्हतं की त्याक्षणी आपण समुद्राच्या पाण्याच्या पाच सेकंद इतक्याच वर आहोत.
पाच सेकंदात विमान पाण्याखाली होतं..
सर्वच्या सर्व जीव म्हणजे सव्वादोनशेजण तात्काळ गेले..
विमानात काही दोष नव्हता.. एका तबकडीचा थोडा दोष.. पण तीही तीन ठिकाणी तीनजणांसमोर बसवलेली.. त्यातल्या दोन अचूक होत्या..
तरीही सव्वादोनशेजण गेले..
पायलट्सनी एकमेकांना “डावा..उजवा” असं स्पष्ट न म्हटल्याने..

shit… damn scary!
man…thats horribal…!!